सत्संगदीक्षा- मराठी

   ॥ श्री स्वामीनारायण विजयते

॥ सत्संगदीक्षा ॥

स्वामिनारायण भगवान म्हणजे साक्षात अक्षरपुरुषोत्तम महाराज यांनी सर्वांना परम शांती, आनंद आणि सुख द्यावे. (1)

हा देह मुक्तीचे साधन आहे, केवळ भोग भोगण्याचे साधन नाही. दुर्लभ आणि नाशवंत असा हा देह वारंवार मिळत नाही. (2)

लौकिक व्यवहार तर देहाच्या निर्वाहासाठी आहे. ते या मनुष्य जन्माचे परम लक्ष्य नाही. (3)

सर्व दोष टाळण्यासाठी, ब्रह्मस्थिती प्राप्त करण्यासाठी तसेच भगवंतांची भक्ती करण्यासाठी हा देह मिळालेला आहे. हे सर्व सत्संग केल्याने अवश्य प्राप्त होते म्हणून मुमुक्षूंनी सदैव सत्संग करावा. (4-5)

त्यासाठीच परब्रह्म स्वामिनारायणांनी या लोकी साक्षात अवतार घेऊन, या दिव्य सत्संगाची स्थापना केली. (6)

या सत्संगाचे ज्ञान मुमुक्षूंना व्हावे, अशा शुभ हेतूने ‘सत्संगदीक्षा’ या नावाचा ग्रंथ रचण्यात आला आहे. (7)

सत्य अशा आत्म्याचा संग करावा, सत्य अशा परमात्म्याचा संग करावा, सत्य अशा गुरूंचा संग करावा आणि सद्‌ग्रंथांचा संग करावा. हे सत्संगाचे खरे लक्षण जाणावे. असा दिव्य सत्संग करणारा मनुष्य सुखी होतो. (8-9)

सत्य अशा आत्म्याचा संग करावा, सत्य अशा परमात्म्याचा संग करावा, सत्य अशा गुरूंचा संग करावा आणि सद्‌ग्रंथांचा संग करावा. हे सत्संगाचे खरे लक्षण जाणावे. असा दिव्य सत्संग करणारा मनुष्य सुखी होतो. (8-9)

या ग्रंथात परब्रह्म परमात्मा सहजानंद स्वामींनी दर्शवलेल्या, आज्ञा तसेच उपासनापद्धतींना स्पष्ट रीतीने समजावल्या आहेत. (11)

या ग्रंथात परब्रह्म परमात्मा सहजानंद स्वामींनी दर्शवलेल्या, आज्ञा तसेच उपासनापद्धतींना स्पष्ट रीतीने समजावल्या आहेत. (11)

सर्व स्त्री-पुरुष, सत्संगाचे अधिकारी आहेत, सर्व सुखांचे अधिकारी आहेत आणि सर्व ब्रह्मविद्येचेही अधिकारी आहेत. (12)

सत्संगात लिंगभेदामुळे कोणासही श्रेष्ठ-कनिष्ठ समजूच नये. सर्वजण आपापल्या मर्यादेत राहून, भक्तीद्वारे मुक्ती प्राप्त करू शकतात. (13)

सर्व वर्णांचे सर्व स्त्री-पुरुष सदैव सत्संग, ब्रह्मविद्या आणि मोक्षाचे अधिकारी आहेत. वर्णाच्या आधारे कधीही श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद करू नये. सर्वांनी स्वतःचा वर्णाभिमान त्यागून परस्पर सेवा करावी. जातीने कोणी महान अथवा कोणी हीन पण नाही. म्हणून जाती-पातीमुळे कोणी क्लेश करून घेऊ नये आणि सुखाने सत्संग करावा. (14-16)

गृहस्थ तसेच त्यागी असे सर्व मोक्षाचे अधिकारी आहेत. त्यात श्रेष्ठ-कनिष्ठ भेद नाही, कारण की गृहस्थ किंवा त्यागी सर्व भगवंतांचे भक्त आहेत. (17)

स्वामिनारायण भगवंतांविषयी अनन्य, दृढ आणि परम भक्तीसाठी आश्रयदीक्षामंत्र ग्रहण करून सत्संग प्राप्त करावा. (18)

आश्रयदीक्षामंत्र या प्रमाणे आहे:

धन्योऽस्मि पूर्णकामोऽस्मि निष्पापो निर्भयः सुखी।

अक्षरगुरुयोगेन स्वामिनारायणाऽऽश्रयात् ॥1 (19)

1मंत्र वर लिहिल्या प्रमाणे म्हणावा. मंत्राचे तात्पर्य असे आहे की, अक्षरब्रह्म गुरूंच्या योगाने स्वामिनारायण भगवंतांचा आश्रय घेतल्याने मी धन्य आहे, पूर्णकाम आहे, निष्पाप, निर्भय आणि सुखी आहे.

मुमुक्षूनी स्वतःच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी सहजानंद श्रीहरि तथा अक्षरब्रह्मस्वरूप अशा गुणातीत गुरूंचा प्रीतिपूर्वक आश्रय करावा. (20)

सत्संगाचा आश्रय करून गळ्यात काष्ठाची दुहेरी माळ सदैव धारण करावी, तसेच सत्संगाचे नियम धारण करावेत. (21)

या संसारात ब्रह्मस्वरूप गुरूंशिवाय जीवनात ब्रह्मविद्येचा तत्त्वरूपाने साक्षात्कार होऊ शकत नाही. (22)

अक्षरब्रह्म गुरूंशिवाय परमात्म्याविषयी उत्तम निर्विकल्प निश्चय होऊ शकत नाही, तसेच स्वतःच्या आत्म्याविषयी ब्रह्मभावही प्राप्त होऊ शकत नाही. (23)

ब्रह्मस्वरुप गुरूंशिवाय यथार्थ भक्तीही होऊ शकत नाही, परम आनंदाची प्राप्ती होऊ शकत नाही आणि त्रिविध तापांचा नाशही होऊ शकत नाही. (24)

म्हणून सर्व अर्थांची सिद्धी करणारे आणि परमात्म्याचा अनुभव करवणारे अशा प्रत्यक्ष अक्षरब्रह्म गुरुंचा आश्रय सदैव करावा. (25)

सर्व सत्संगींनी सर्व दुर्व्यसनांचा सदैव त्याग करावा. कारण व्यसन अनेक रोगांचे तसेच दुःखांचे कारण बनते. (26)

दारू, भांग तसेच तंबाखू इत्यादी जे जे पदार्थ मादक असतील, ते कधीही खाऊ किंवा पिऊ नये, तसेच धूम्रपानाचा पण त्याग करावा. (27)

सर्व स्त्री आणि पुरुषांनी सर्व प्रकारच्या जुगारांचा आणि व्यभिचारांचा त्याग करावा. (28)

सत्संगी जनांनी कधीही मांस, मासे, अंडे तसेच कांदे, लसूण व हिंग खाऊ नये. (29)

पाणी तथा दूध इत्यादी पेय पदार्थ गाळूनच घ्यावेत. अशुद्ध खाद्य पदार्थ व पेय पदार्थ कधीही ग्रहण करू नयेत. (30)

सत्संगींनी चोरी कधीही करू नये. धर्मकार्यांसाठी सुद्धा कधीही चोरी करू नये. (31)

फुले, फळे अशा वस्तू देखील धन्याच्या परवानगीशिवाय घेऊ नयेत. परवानगीशिवाय वस्तू घेणे ही सूक्ष्म चोरी म्हटली जाते. (32)

कधीही मनुष्य, पशू, पक्षी तथा ढेकूण आदी कोणत्याही जीवजंतूंची हिंसा करू नये. अहिंसा परम धर्म आहे, हिंसा अधर्म आहे. असे श्रुती-स्मृत्यादी ग्रंथात स्पष्ट सांगितले आहे. (33-34)

सत्संगींनी देखील यज्ञ कार्यासाठीही निर्दोष प्राण्यांची हिंसा कधीही करू नये. (35)

यज्ञयाग करावयाचे असल्यास, संप्रदायाच्या सिद्धांतानुसार हिंसारहितच करावेत. (36)

यज्ञाचे शेष भाग म्हणून किंवा देवतेचा प्रसाद म्हणूनही सत्संगींनी कधीही मांस खाऊ नये. (37)

कधीही कोणाला ताडन करू नये, अपशब्द बोलणे, अपमान करणे इत्यादी कोठल्याही प्रकारे सूक्ष्म (किंचितही) हिंसा सुद्धा करू नये. (38)

धन, सत्ता, कीर्ती, स्त्री-पुरुष इत्यादींच्या प्राप्तीसाठी, तसेच मान-ईर्षा किंवा क्रोधाच्या आहारी जाऊन पण हिंसा करू नये. (39)

मनाने, वचनाने किंवा कर्माने हिंसा केल्याने त्याच्यात राहिलेले स्वामिनारायण भगवान दुखावले जातात. (40)

आत्महत्या ही देखील हिंसाच आहे. म्हणून कुठून तरी उडी घेऊन, फाशी घेऊन किंवा विष पिऊन इत्यादी कोठल्याही प्रकारे आत्महत्या कधीही करू नये. (41)

दुःख, लज्जा, भय, क्रोध तसेच रोग इत्यादी आपत्तींमुळे किंवा धर्मासाठी पण कोणीही स्वतःची किंवा अन्य कोणाची हत्या करू नये. (42)

मुमुक्षूने तीर्थस्थानी सुद्धा आत्महत्या करूच नये. मोक्ष किंवा पुण्याच्या लालसेनेही तीर्थस्थानीसुद्धा आत्महत्या करूच नये. (43)

भगवंत सर्वकर्ता आहेत, दयाळू आहेत, सर्वांचे रक्षण करणारे आहेत आणि तेच सदैव माझ्या सर्व संकटांना टाळणारे आहेत. (44)

भगवंत जे करतील ते सदैव भल्यासाठीच असते. त्यांची इच्छा हेच माझे प्रारब्ध आहे. तेच माझे तारक आहेत. (45)

माझी विघ्ने, पाप, दोष तसेच दुर्गुण अवश्य नाश पावतील. मी अवश्य शांती, परम आनंद आणि सुख प्राप्त करीन. (46)

कारण मला साक्षात अक्षरपुरुषोत्तम महाराज भेटले आहेत. त्यांच्या बळाने मी नक्की दुःखाला तरुन जाईन. (47)

अशा रीतीने विचारांचे बळ राखून, आश्रित भक्ताने कधीही हिंमत न हारता भगवंतांच्या बळाने आनंदात रहावे. (48)

शास्त्रांनी आणि समाजाने निषिद्ध केलेल्या स्थानी कधीही थुंकू नये किंवा मल-मूत्र विसर्जन करू नये. (49)

बाह्य तसेच आंतरिक अशा सर्व प्रकारच्या शुद्धीचे पालन करावे. श्रीहरींना शुद्धी प्रिय आहे आणि शुद्ध मनष्यावर ते प्रसन्न होतात. (50)

सत्संगींनी सदैव सूर्योदयापूर्वी उठावे. त्यानंतर स्नानादी करून शुद्ध वस्त्रे धारण करावीत. (51)

त्यानंतर शुद्ध आसनावर पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसून नित्यपूजा करावी. (52)

स्वामिनारायण मंत्राचा जप करीत तसेच गुरूंचे स्मरण करीत कपाळावर भगवंतांच्या पूजेद्वारा प्रसादीभूत झालेल्या चंदनाचा तिलक करावा आणि कुंकवाचा टिळा लावावा. तसेच छाती आणि दोन्ही भुजांवरही चंदनाने तिलक-टिळा करावा. (53-54)

स्त्रियांनी भगवंतांचे तसेच गुरूंचे स्मरण करीत कपाळावर केवळ कुंकवाचा टिळा लावावा. तिलक करू नये. (55)

त्यानंतर सत्संगाच्या आश्रित भक्ताने पूजेच्या अधिकारासाठी भगवंतांच्या प्रतापाचे चिंतन करता करता आत्मविचार करावा. प्रसन्न चित्ताने व भक्तिभावाने ‘अक्षरम् अहं पुरुषोत्तमदासोस्मि’ या पवित्र मंत्राचे उच्चारण करावे. स्वतःच्या आत्म्या विषयी अक्षरब्रह्मांची विभावना करावी आणि शांत होऊन, एकाग्रचित्ताने मानसपूजा करावी. (56-58)

भगवंत आणि ब्रह्मस्वरुप गुरूच मोक्षदाता आहेत. त्यांचेच ध्यान आणि मानसपूजा करावी. (59)

त्यानंतर पवित्र वस्त्रावर चित्रप्रतिमांचे व्यवस्थित दर्शन होईल अशा प्रकारे भक्तिभावपूर्वक स्थापना करावी. (60)

त्यात मधोमध अक्षर तथा पुरुषोत्तमांची मूर्ती स्थापावी, म्हणजेच गुणातीतानंद स्वामी तथा त्यांच्याहून अतीत असलेले महाराजांची स्थापना करावी. (61)

त्यानंतर प्रमुख स्वामी महाराजांपर्यंत प्रत्येक गुरूंच्या मूर्तींची स्थापना करावी आणि आपण स्वतः ज्या प्रत्यक्ष गुरूंची सेवा करत आहोत त्यांची मूर्ती स्थापन करावी. (62)

त्यानंतर आवाहन श्लोकाचे उच्चारण करून महाराज तसेच गुरूंना आवाहन करावे. हात जोडून दास्यभावाने नमस्कार करावा. (63)

आवाहन मंत्र या प्रमाणे आहे:

उत्तिष्ठ सहजानन्द श्रीहरे पुरुषोत्तम । गुणातीताऽक्षर ब्रह्मन्नुत्तिष्ठ कृपया गुरो ॥ आगम्यतां हि पूजार्थम् आगम्यतां मदात्मतः। सान्निध्याद् दर्शनाद् दिव्यात् सौभाग्यं वर्धते मम ॥(64-65)

त्यानंतर स्थिर चित्ताने तथा महिम्या सहित मूर्तींचे दर्शन करीत करीत, स्वामिनारायण मंत्राचा माळेवर जप करावा. तद्नंतर एका पायावर उभे राहून, हात उंच करून मूर्तींचे दर्शन घेत जपमाळ (तपाची माळ) फिरवावी. (66-67)

यानंतर सगळ्यांच्या केंद्र समान आणि व्यापक असे अक्षरपुरुषोत्तम महाराजांचे स्मरण करीत प्रतिमांना प्रदक्षिणा करावी. (68)

त्यानंतर पुरुषांनी दास्यभावाने साष्टांग दंडवत प्रणाम करावेत आणि स्त्रियांनी बसूनच पंचांग प्रणाम करावेत. (69)

कोण्या भक्ताचा द्रोह घडला असेल तर, त्याच्या निवारणार्थ क्षमायाचनापूर्वक प्रतिदिन एक दंडवत प्रणाम अधिक करावा. (70)

त्यानंतर स्वामिनारायण मंत्राचा जप करत शुभ संकल्पांच्या पूर्तीसाठी, दिव्यभाव आणि भक्तीसह प्रार्थना (धून) करावी. (71)

अशा रीतीने भक्तिभावाने पूजा करून पुनरागमन मंत्राद्वारे अक्षरपुरुषोत्तम महाराजांची स्वतःच्या आत्म्यामध्ये स्थापना करावी. (72)

पुनरागमन मंत्र या प्रमाणे आहे:

भक्त्यैव दिव्यभावेन पूजा ते समनुष्ठिता। गच्छाऽथ त्वं मदात्मानम् अक्षरपुरुषोत्तम ॥ (73)

त्या नंतर सत्संगाच्या दृढतेसाठी ज्यात श्रीहरि तसेच गुरूंचे उपदेश आणि आदेश समाविष्ट असतील, असे ग्रंथवाचन रोज करावे. (74)

त्यानंतर आदरपूर्वक नम्रभावाने भक्तांना प्रणाम करावा. अशा रीतीने पूजा केल्यानंतरच स्वतःचे व्यवहारकार्य करावे. (75)

पूजा केल्याशिवाय खाऊ नये आणि पाणीही पिऊ नये. प्रवासात देखील पूजेचा त्याग करू नये. (76)

वृद्धावस्था, रोग किंवा अन्य आपत्तींमुळे स्वतः पूजा करण्यास असमर्थ असल्यास, त्याने कोणा दुसऱ्या कडून पूजा करवून घ्यावी. (77)

घरातील प्रत्येक सत्संगीनी स्वतःची स्वतंत्र पूजा ठेवावी. तसेच ज्या दिवशी पुत्र किंवा पुत्रीचा जन्म होईल, त्या दिवशीच मुलांसाठी पूजा घेऊन ठेवावी. (78)

प्रतिदिन भक्ती, प्रार्थना आणि सत्संग करण्यासाठी सर्व सत्संगींनी घरात सुंदर मंदिर स्थापन करावे. त्यात भक्तिभावाने विधिवत् अक्षरपुरुषोत्तम तसेच परंपरेतील गुणातीत गुरूंची प्रतिष्ठापना करावी. (79-80)

सर्व सत्संगी जनांनी प्रातःकाळी तसेच सायंकाळी, घरमंदिरात प्रतिदिन आरती करावी आणि सोबतच स्तोत्रपठण करावे. (81)

आरतीच्या समयी चित्त स्थिर करून, भक्तिभावाने, टाळ्या वाजवत आणि उच्च स्वराने ‘जय स्वामिनारायण जय अक्षरपुरुषोत्तम...’ असे आरतीगान करावे. (82)

केलेल्या स्वयंपाकाचा नैवेद्य मंदिरात दाखवून, प्रसादिभूत झालेले भोजन भक्तिभावपूर्वक प्रार्थना म्हणून ग्रहण करावे. (83)

भगवंतांना अर्पण केल्याशिवाय अन्न, फळे किंवा जल आदी ग्रहण करू नये. ज्याच्या शुद्धी विषयी शंका असेल असा अन्नाचा नैवेद्य भगवंतांना दाखवू नये आणि खाऊ नये. (84)

घरमंदिरात बसून भावपूर्वक, स्थिर चित्ताने कीर्तन, जप किंवा स्मृती वगैरे स्वतःच्या आवडीनुसार करावे. (85)

घरातील सदस्यांनी एकत्र होऊन रोज घरसभा करावी आणि त्यात भजन, सत्संग-गोष्टी तसेच ग्रंथवाचन इत्यादी करावे. (86)

श्रीहरींनी शुद्ध उपासना-भक्तीच्या पोषण तसेच रक्षणासाठी मंदिर निर्माण करण्याच्या भक्तीचे प्रवर्तन केले आणि भगवंतां प्रमाणेच त्यांचे उत्तम भक्त अशा अक्षरब्रह्मांची भगवंतांसोबतच सेवा करण्याची आज्ञा केली. (87-88)

अक्षरब्रह्म भगवंतांचे उत्तम भक्त आहेत, कारण की ते नित्य मायातीत आहेत आणि नित्य भगवंतांच्या सेवेत रममाण असतात. (89)

त्या आज्ञेनुसार सर्वांचे कल्याण व्हावे त्या हेतूने दिव्य मंदिरांचे निर्माण भक्तिभावाने करण्यात येते आणि त्यांच्या मध्य गाभाऱ्यात पुरुषोत्तम भगवंतांच्या मूर्तीसोबतच अक्षरब्रह्मांची मूर्ती देखील विधिवत स्थापित करण्यात येते. (90-91)

अशाच रीतीने घरी किंवा अन्य स्थळी असलेल्या मंदिरांमध्ये देखील मधोमध नेहमी अक्षरब्रह्मांसहित पुरुषोत्तम भगवंत प्रस्थापित केले जातात. (92)

सर्व सत्संगींनी सकाळी, संध्याकाळी अथवा स्वतःच्या सोयीने प्रतिदिन भक्तिभावाने, जवळपास असलेल्या मंदिरात दर्शनाला जावे. (93)

सर्व सत्संगी नर-नारींनी सदैव ज्या रीतीने स्वधर्माचे रक्षण होईल, अशीच वस्त्रे परिधान करावीत. (94)

सत्संगाच्या दृढतेसाठी जवळपास असलेल्या मंदिरात किंवा मंडळात साप्ताहिक सभेसाठी अवश्य जावे. (95)

अक्षराधिपती स्वामिनारायण भगवान साक्षात परमात्मा परब्रह्म पुरुषोत्तम हरि आहेत. (96)

ते एकच आपले सदैव परम उपास्य इष्टदैवत आहे. सदैव त्यांचीच अनन्य भावे भक्ती करावी. (97)

गुणातीतानंद स्वामी साक्षात सनातन अक्षरब्रह्म आहेत. अक्षरब्रह्मांची ही परंपरा आजही विराजमान आहे. (98)

संप्रदायात गुणातीतानंद स्वामींपासून आरंभ झालेल्या गुरुपरंपरेतील प्रकट अक्षरब्रह्म हे एकच आपले गुरू आहेत. (99)

आपले इष्टदैवत एकच आहेत, गुरु एकच आहेत आणि सिद्धांतही एकच आहे. अशी आपली सदैव एकता आहे. (100)

ब्रह्मविद्यारूप, वैदिक आणि सनातन अशा दिव्य अक्षरपुरुषोत्तम सिद्धांताला जाणावे. (101)

जीव, ईश्वर, माया, अक्षरब्रह्म तथा परब्रह्म हे पाच तत्त्व सदैव भिन्न आहेत, नित्य आहेत आणि सत्य आहेत असे मुमुक्षूंनी जाणावे - असा स्वयं स्वामिनारायण भगवंतांनी स्पष्ट सिद्धांत केला आहे. (102-103)

त्यात अक्षर आणि पुरुषोत्तम हे दोघेही सदैव मायातीत आहेत आणि जीव तथा ईश्वरांची मुक्ती त्यांच्या योगाने होते. (104)

परमात्मा परब्रह्म सदा अक्षरब्रह्मांहून अतीत आहेत आणि अक्षरब्रह्मही त्या परमात्म्याची नित्य दास्यभावाने सेवा करतात. (105)

भगवान सदा सर्वकर्ता, साकार, सर्वोपरी आहेत आणि मुमुक्षूंच्या मुक्तीसाठी सदैव प्रकट राहतात. (106)

अक्षरब्रह्मस्वरूप गुरूंद्वारे भगवान स्वतःच्या समग्र ऐश्वर्यांसह, परमानंद अर्पण करीत सदैव प्रकट राहतात. (107)

अक्षरब्रह्म गुरूंविषयी दृढ प्रीती आणि आत्मबुद्धी करावी. त्यांच्यात प्रत्यक्ष भगवद्भाव आणून भक्तिभावाने त्यांची सेवा तथा ध्यान करावे. (108)

स्वामिनारायण मंत्र दिव्य, अलौकिक आणि शुभ मंत्र आहे. स्वयं श्रीहरींनी हा मंत्र दिला आहे. सर्व भक्तांनी त्याचा जप करावा. या मंत्रात ‘स्वामि’ शब्दाने अक्षरब्रह्मांना समजावे आणि ‘नारायण’ शब्दाने त्या अक्षरब्रह्मांहून अतीत अशा पुरुषोत्तमांना समजावे. (109-110)

हा सिद्धांत भगवान स्वामिनारायणांनी या लोकात प्रबोधित केला. गुणातीत गुरूंनी त्याला दिगंतरी पोहोचवला. शास्त्रीजी महाराजांनी त्याला मूर्तिमंत केला. गुरुंच्या जीवनचरित्र-ग्रंथांमध्ये त्याची पुन्हा दृढता करवण्यात आली. हा सिद्धांत गुरुहरि प्रमुख स्वामी महाराजांनी स्वहस्ताक्षरात लिहून स्थिर केला. साक्षात गुरुहरींच्या प्रत्यक्ष प्रसंगाने हा सिद्धांत जीवनात प्राप्त करू शकतो. या सत्य सनातन मुक्तिप्रद सिद्धांतालाच दिव्य ‘अक्षरपुरुषोत्तम दर्शन’ म्हटले जाते. (111-114)

अशा परम दिव्य सिद्धांताचे चिंतन करता करता निष्ठेने आणि आनंद-उत्साहपूर्वक सत्संग करावा. (115)

तीन देहांहून विलक्षण अशा स्वतःच्या आत्म्याविषयी ब्रह्मरूपाची विभावना करून सदैव परब्रह्मांची उपासना करावी. (116)

अक्षराधिपती परमात्म्याची भक्ती सदैव धर्मासहित करावी. धर्मरहित भक्ती कधीही करू नये. (117)

भक्ती किंवा ज्ञानाचे आलंबन घेऊन किंवा कोणत्याही पर्वाचे आलंबन घेऊनसुद्धा, मनुष्याने अधर्माचे आचरण करू नये. (118)

पर्वामध्ये पण भांग, दारू आदीचे सेवन करणे, जुगार आदी खेळणे, शिवीगाळ करणे इत्यादी करू नये. (119)

परब्रह्म आणि अक्षरब्रह्मांशिवाय अन्यत्र प्रीती नसावी ते वैराग्य आहे. ते भक्तीचे सहायक अंग आहे. (120)

निंदा, लज्जा, भय किंवा अडचणींमुळे कधीही सत्संग, स्वामिनारायण भगवान, त्यांची भक्ती आणि गुरू यांचा त्याग करू नये. (121)

भगवंतांची आणि भक्तांची सेवा शुद्धभावाने, माझे मोठे भाग्य आहे असे मानून स्वतःच्या मोक्षासाठी करावी. (122)

सत्संग आणि भजनाशिवाय व्यर्थ काळ व्यतीत करू नये. आळस आणि प्रमाद वगैरेचा सदैव परित्याग करावा. (123)

भजन करता करता कर्म करावे, आज्ञेनुसार करावे. असे केल्याने कर्माचे बंधन होत नाही, कर्माचे ओझे जाणवत नाही आणि कर्माचा अभिमान येत नाही. (124)

सेवा, कथा, स्मरण, ध्यान, पठनादी तथा भगवत्कीर्तन वगैरेने वेळ सुफळ करावा. (125)

सत्संगाचा आश्रय स्वतःच्या दुर्गुणांना टाळण्यासाठी, सद्गुणांच्या प्राप्तीसाठी आणि स्वतःच्या परम कल्याणासाठी करावा. (126)

स्वामिनारायण भगवान आणि गुणातीत गुरूंची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी सदैव सत्संगाचा आश्रय करावा. (127)

अहो! आपल्याला अक्षर आणि पुरुषोत्तम दोन्ही येथेच मिळाले आहेत. त्यांच्या प्राप्तीच्या कैफाने सत्संगाचा आनंद सदैव मानावा. (128)

सेवा, भक्ती, कथा, ध्यान, तप तथा यात्रा इत्यादी साधन करावे ते मान, दंभ, ईर्ष्या, स्पर्धा, द्वेषाने किंवा लौकिक फळाच्या इच्छेने करूच नये. परंतु श्रद्धेने, शुद्धभावाने आणि भगवंतांना प्रसन्न करण्याच्या भावाने करावे. (129-130)

भगवान तथा गुरुंविषयी मनुष्यभाव बाळगू नये. कारण की अक्षर आणि पुरुषोत्तम हे दोन्ही मायातीत, दिव्य आहेत. (131)

भगवान तथा गुरूंविषयी दृढ विश्वास ठेवावा, निर्बळतेचा त्याग करावा, धैर्य ठेवावे आणि भगवंतांचे बळ ठेवावे. (132)

स्वामिनारायण भगवंतांच्या लीलाचरित्रांचे श्रवण, कथन, वाचन, मनन करावे व निदिध्यास करावा. (133)

मुमुक्षूंनी प्रत्यक्ष अक्षरब्रह्म गुरूंचा सत्संग सदैव परम प्रीती आणि दिव्यभावाने करावा. (134)

अक्षरब्रह्मस्वरूप गुरूंविषयी दृढ प्रीतीच ब्राह्मीस्थिती तथा भगवंतांच्या साक्षात्काराचे साधन आहे. (135)

अक्षरब्रह्म गुरूंचे गुण आत्मसात करण्यासाठी आणि परब्रह्मांची अनुभूती करण्यासाठी अक्षरब्रह्म गुरूंच्या चरित्रांचे सदैव मनन करावे. (136)

कायावाचामने करून गुरुहरींचे सदैव सेवन करावे आणि त्यांच्याविषयी प्रत्यक्ष नारायणस्वरुपाचा भाव ठेवावा. (137)

सत्संगींनी कधीही बळहीन गोष्टी ऐकू नये आणि करू ही नये. सदैव हिंमतपूर्ण गोष्टी कराव्यात. (138)

प्रेमाने आणि आदराने ब्रह्म आणि परब्रह्मांच्या व त्यांच्या भक्तांच्या महिम्या संबंधीच्या गोष्टी निरंतर कराव्यात. (139)

मुमुक्षूंनी सत्संगींमध्ये सुहृद्भाव (सौहार्द), दिव्यभाव आणि ब्रह्मभाव ठेवावा. (140)

परमात्मा परब्रह्म स्वामिनारायण भगवान, अक्षरब्रह्मस्वरूप गुणातीत गुरू यांनी दिलेले दिव्य सिद्धांत तथा त्यांच्या आश्रित भक्तांचा विवेकपूर्वक सदैव पक्ष ठेवावा. (141-142)

भगवंत आणि ब्रह्मस्वरूप गुरूंच्या आज्ञेचे सदैव पालन करावे. त्यांच्या अनुवृत्तिला दृढपणे अनुसरावे. त्यांची आज्ञा आळस वगैरे सोडून पाळावी, तत्काळ पाळावी; सदैव आनंद, उत्साह आणि महिम्यासह त्यांना प्रसन्न करण्याच्या भावनेने पाळावी.(143-144)

प्रतिदिन स्थिर चित्ताने अंतर्दृष्टी करावी की मी या लोकात काय करण्यासाठी आलो आहे? आणि काय करत आहे? (145)

अक्षररूप होऊन मी पुरुषोत्तमांची भक्ती करेन’ असे आपल्या लक्ष्याचे चिंतन आळस न करता रोज करावे. (146)

हे स्वामिनारायण भगवान सर्वकर्ताहर्ता आहेत, सर्वोपरी आहेत, नियामक आहेत. ते मला येथे प्रत्यक्ष मिळाले आहेत. म्हणूनच मी धन्य आहे, परम भाग्यशाली आहे, कृतार्थ आहे, निःशंक आहे, निश्चिंत आहे आणि सदैव सुखी आहे. (147-148)

अशा प्रकारे परमात्माच्या दिव्य प्राप्तीचे, महिम्याचे तसेच त्यांच्या प्रसन्नतेचे चिंतन दररोज स्थिर चित्ताने करावे. (149)

स्वतःच्या आत्म्याला तीन देह, तीन अवस्था तथा तीन गुणांपेक्षा अतीत समजून त्याची अक्षरब्रह्मांसोबत एकतेची विभावना प्रतिदिनी करावी. (150)

दररोज जगाच्या नश्वरतेचा अनुसंधान घ्यावा आणि स्वतःच्या आत्म्याच्या नित्यत्व आणि सच्चिदानंदत्वाचे चिंतन करावे. (151)

जे काही झाले, होत आहे आणि होणार आहे, ते सर्व स्वामिनारायण भगवंतांच्या इच्छेने माझ्या हितासाठीच झाले आहे, असे मानावे. (152)

स्वामिनारायण भगवान आणि ब्रह्मस्वरूप गुरूंची प्रतिदिन श्रद्धा आणि भक्तिभावाने प्रार्थना करावी. (153)

मान, ईर्ष्या, काम, क्रोध, इत्यादी दोष उद्भवल्यास ‘मी अक्षर आहे, पुरुषोत्तमांचा दास आहे,’ असे शांत मनाने चिंतन करावे. (154)

आणि सर्वदोषांचे निवारण करणारे साक्षात स्वामिनारायण भगवान माझ्या सोबत आहेत, असा बळ ठेवावा. (155)

स्वधर्माचे सदैव पालन करावे, परधर्माचा त्याग करावा. भगवंत आणि गुरूंच्या आज्ञेचे पालन करणे हा स्वधर्म आहे. त्यांच्या आज्ञेचा अव्हेर करून स्वतःच्या मना प्रमाणे वागणे, त्याला विवेकी मुमुक्षूने परधर्म जाणावा. (156-157)

जे कर्म फलदायी असेल, तरीसुद्धा भक्तीमध्ये व्यत्यय आणत असेल, सत्संगाच्या नियमा विरुद्ध असेल तसेच ज्याच्या आचरणाने धर्माचा लोप होत असेल, त्या कर्माचे आचरण करू नये. (158)

वयाने, ज्ञानाने किंवा गुणांनी जे श्रेष्ठ आहेत, त्यांना आदराने प्रणाम करावा तथा मधुर वचनाने यथोचित सन्मान करावा. (159)

विद्वान, वडील आणि अध्यापक यांना नेहमी आदर द्यावा, मधुरवचन इत्यादी क्रियेद्वारे यथाशक्तीनुसार त्यांचा सत्कार करावा. (160)

प्रत्येक व्यक्तीचे गुण तथा कार्यानुसार त्यांना संबोधीत करावे. यथाशक्ती त्यांना चांगल्या कार्यात प्रोत्साहन द्यावे. (161)

सत्य, हित आणि प्रिय वाणी बोलावी. कोणत्याही मनुष्यावर कधीही खोटे आरोप लावू नये. (162)

ऐकणाऱ्याला पीडा देणारी, अपशब्दयुक्त, निंद्य, कठोर, द्वेषयुक्त अशी कुत्सित वाणी बोलू नये. (163)

असत्य कधीही बोलू नये, हितकारी असे सत्य बोलावे. दुसऱ्यांचे अहित करणारे सत्य पण बोलू नये. (164)

कधीही कोणाचे अवगुण किंवा दोषाची चर्चा करू नये. असे केल्याने अशांती होते तथा भगवंत व गुरू अप्रसन्न होतात. (165)

अत्यंत आवश्यक असल्यास परमशुद्ध भावनेने, अधिकृत व्यक्तीला सत्य सांगण्यास दोष नाही. (166)

जेणे करून दुसऱ्यांचे अहित होईल, दुःख होईल किंवा क्लेश वाढेल, तसे आचार किंवा विचार कधीही करू नये. (167)

सुहृद्‌भाव (सौहार्द) ठेवून भक्तांच्या शुभ गुणांचे स्मरण करावे, त्यांचे अवगुण घेऊ नये आणि कोणत्याही प्रकाराने द्रोह करू नये. (168)

    सुखात उन्मत्त व दुःखात हताश होऊ नये. कारण सर्व स्वामिनारायण भगवंतांच्या इच्छेने घडत आहे. (169)

कधीही कोणाशी विवाद किंवा भांडण (कलह) करूच नये. नेहमी विवेकाने वागावे आणि शांती ठेवावी. (170)

कोणत्याही मनुष्याने स्वतःच्या वचन, वर्तन, विचार तसेच लिखाणात कधीही कठोरता आणू नये. (171)

गृहस्थ सत्संगींनी माता-पित्यांची सेवा करावी. प्रतिदिन त्यांच्या चरणी नमस्कार करावा. (172)

सूनबाईने सासऱ्याची सेवा पितातुल्य जाणून आणि सासूची सेवा मातातुल्य जाणून करावी. सासू-सासऱ्यांनी पण सूनबाईचे स्वतःच्या मुली प्रमाणे पालन करावे. (173)

गृहस्थांनी मुलांचे सत्संग, शिक्षण वगैरे द्वारा उत्तम प्रकारे पोषण करावे. अन्य संबंधींची यथाशक्ती भावपूर्वक सेवा करावी. (174)

घरात गोड बोलावे. पीडादायक कटू वाणीचा त्याग करावा आणि मलीन आशयाने कुणाला पीडा देऊ नये. (175)

गृहस्थांनी स्वतःच्या घरात एकत्रपणे आनंदाने भोजन करावे आणि घरी आलेल्या अतिथीची यथाशक्ती काळजी घ्यावी. (176)

मरण आदी प्रसंगी विशेषकरून कथा-कीर्तन करावे आणि अक्षरपुरुषोत्तम महाराजांचे स्मरण करावे. (177)

संततींवर सत्संगाचे दिव्य सिद्धांत, सदाचरण आणि सद्गुणांचे सदैव संस्कार करावेत. (178)

गर्भावस्थेतच संतानावर सत्संगसंबंधी शास्त्रांचे वाचन इत्यादी करून संस्कार करावेत आणि अक्षरपुरुषोत्तम महाराजांची निष्ठा करवावी. (179)

पुरुषांनी कधीही स्त्रियांना वाईट नजरेने बघू नये. तसेच स्त्रियांनी पण पुरुषांना वाईट नजरेने बघू नये. (180)

    गृहस्थाश्रमी पुरुषांनी परस्त्रियांसोबत आपत्काळा व्यतिरिक्त कोठेही एकांतात राहू नये. (181)

तसेच स्त्रियांनी पण परपुरुषांसोबत आपत्काळा व्यतिरिक्त कोठेही एकांतात राहू नये. (182)

पुरुषांनी जवळच्या संबंध नसलेल्या स्त्रियांना स्पर्श करू नये. त्याच प्रमाणे स्त्रियांनी जवळच्या संबंध नसलेल्या पुरुषांना स्पर्श करू नये. (183)

आपत्काळी इतरांचे रक्षण करण्यात स्पर्शदोष नाही. परंतु जर आपत्काळ नसेल तर सदैव नियमांचे पालन करावे. (184)

धर्म आणि संस्कारांचा नाश होईल असे अश्लील दृश्य ज्यात येत असेल तसे नाटक किंवा चलचित्र कधीही पाहू नये. (185)

सत्संगींनी व्यसनी, निर्लज्ज आणि व्यभिचाऱ्यांची संगत करू नये. (186)

स्त्रियांनी स्वधर्म रक्षणासाठी चारित्र्यहीन स्त्रियांची संगत करू नये आणि दृढतेने नियमांचे पालन करावे. (187)

ज्यामुळे कामवासनेची वृद्धी होत असेल अशी गोष्टी-गाणी ऐकू नयेत, पुस्तके वाचू नयेत व तसे दृष्य पाहू नयेत. (188)

धन, द्रव्य तथा जमीन संबंधी कार्य देवाणघेवाण सदैव साक्षीदारासमक्ष लेखी करावे, इत्यादी नियम अवश्यपणे पाळावेत. (189)

सर्व आश्रितांनी नातेवाईकांसोबत पण मालमत्तेचे व्यवहार प्रसंगी सदैव साक्षीदारासमक्ष लेखी करावे, इत्यादी नियम पाळावेत. (190)

सत्संगींनी कधीही दुर्जानांसोबत व्यवहार करू नये आणि दीनजनां विषयी दयावान व्हावे. (191)

लौकिक कार्य कधीही अविचाराने तत्काळ करू नये, परंतु फळ वगैरेचा विचार करून विवेकपूर्वक करावे. (192)

कोणत्याही मनुष्याने कधीही लाच घेऊ नये. धनाचा वायफळ खर्च करू नये. आपल्या आय प्रमाणे धनाचा व्यय करावा. (193)

प्रशासनाच्या नियमांना अनुसरून सदैव आपल्या आय-व्ययाची नोंद कायदेशीर करावी. (194)

आपल्या उत्पन्नाचा दहावा किंवा विसावा भाग यथाशक्ती स्वामिनारायण भगवंतांच्या सेवा-प्रसन्नतेसाठी अर्पण करावा. (195)

गृहस्थाने स्वतःच्या उपयोगानुसार तसेच समयशक्ती अनुसार अन्न, द्रव्य व धनादीचा संग्रह करावा. (196)

पाळीव पशू-पक्ष्यांचा यथाशक्ती दाणापाणी इत्यादी द्वारा उचित रीतीने सांभाळ करावा. (197)

धन, द्रव्य व जमीन वगैरेची देवाणघेवाणात विश्वासघात तथा कपट करू नये. (198)

कर्मचाऱ्यांना ठरल्याप्रमाणे धन आदी द्यावे पण कधीही कमी देऊ नये. (199)

सत्संगीनी विश्वासघात करू नये, दिलेला शब्द पाळावा. प्रतिज्ञेचे उल्लंघन करू नये. (200)

सुशासनासाठी आवश्यक असणाऱ्या धर्माचे प्रशासकांनी पालन करावे. लोकांचे भरणपोषण करावे. संस्कारांचे जतन करावे. सर्वांच्या अभ्युदयासाठी स्वास्थ्य, शिक्षण, संरक्षण, वीज, धान्य, पाणी वगैरे मुबलक उपलब्ध करावे. (201-202)

कोणत्याही माणसाचे गुण, क्षमता, आवड वगैरे जाणून, विचार करून, त्याच्यासाठी उचित अशा कार्यात त्याला जोडावा. (203)

ज्या देशात भगवद्भक्ती होऊ शकेल तथा स्वधर्माचे पालन होऊ शकेल त्या देशात सुखाने निवास करावा. (204)

विद्या, धन आदीच्या प्राप्तीसाठी परदेशात गेल्यास तेथे पण आदरपूर्वक सत्संग करावा व नियमांचे पालन करावे. (205)

ज्या देशात स्वतः राहत असतील, त्या देशाच्या प्रशासनाला संमत नियमांचे सर्व प्रकारे पालन करावे. (206)

जेव्हा देशकाळाची विपरीत परिस्थिती येईल तेव्हा धैर्य ठेवून अक्षरपुरुषोत्तम महाराजांचे आनंदाने अंतरात भजन करावे. (207)

ज्या देशात राहत असू, त्या देशाचा आपत्काळी त्याग करून अन्य देशात सुखाने निवास करावा. (208)

लहान बाल-बालिकांनी बालपणापासूनच विद्यार्जन करावे. दुराचार, कुसंगती व व्यसनांचा त्याग करावा. (209)

विद्यार्थ्याने स्वतःचा अभ्यास स्थिर चित्ताने, उत्साहाने व आदराने करावा. व्यर्थ कर्मांमध्ये वेळ वाया घालवू नये. (210)

बालपणापासूनच सेवा, विनम्रता वगैरे दृढ करावी. कधीही निर्बळ होऊ नये, तसेच भयभीत होऊ नये. (211)

बालपणापासूनच सत्संग, भक्ती आणि प्रार्थना करावी. प्रतिदिन पूजा करावी तथा माता-पित्यांना पंचांग प्रणाम करावा. (212)

कुमार वयात तथा यौवनावस्थेत विशेष संयम पाळावा. शक्तीपात करणारे असे अयोग्य स्पर्श व दृश्य वगैरेचा त्याग करावा. (213)

उत्तम फलदायी, उन्नतीकारक व उचित असेच साहस करावे. जे केवळ स्वतःचे व इतरांचे रंजन करेल तसे साहस करू नये. (214)

स्वकर्मात कधीही आळस करू नये. भगवंतांच्याविषयी श्रद्धा आणि प्रीती करावी. प्रतिदिन पूजा करावी आणि सत्संग करावा. (215)

या लोकात संगत बलवान आहे. जशी संगत असेल तसे जीवन बनेल. म्हणून चांगल्या मनुष्यांची संगत करावी, कुसंगाचा सर्वथा त्याग करावा. (216)

कामासक्त, कृतघ्न, लबाड, पाखंडी व कपटी माणसाची संगत करू नये. (217)

जो मनुष्य भगवंत आणि त्यांच्या अवतारांचे खंडन करत असेल, परमात्म्याच्या उपासनेचे खंडन करत असेल आणि साकार भगवंतांना निराकार मानत असेल त्याचा संग करू नये. तसे ग्रंथ वाचू नयेत. (218-219)

मंदिर व भगवंतांच्या मूर्ती भंजकाचा, सत्य-अहिंसा इत्यादी धर्मांचे खंडन करत असेल त्याच्या संगतीचा त्याग करावा. (220)

मंदिर व भगवंतांच्या मूर्ती भंजकाचा, सत्य-अहिंसा इत्यादी धर्मांचे खंडन करत असेल त्याच्या संगतीचा त्याग करावा. (220)

एखादा मनुष्य लोक व्यवहारात बुद्धिमान असेल अथवा शास्त्रात पारंगतपण असेल तरी सुद्धा भक्तिहीन असेल तर त्याचा संग करू नये. (222)

अध्यात्मिक विषयांत श्रद्धेचाच तिरस्कार करून जो मनुष्य केवळ तर्कालाच पुढे करत असेल, त्याचा संग करू नये. (223)

मुमुक्षू हरिभक्तांनी सत्संगात असलेल्या कुसंगीला पण ओळखून त्याची कधीही संगत करू नये. (224)

जो मनुष्य प्रत्यक्ष भगवंत आणि गुरूंमध्ये मनुष्यभाव पाहत असेल आणि नियमपालनात शिथिल असेल, त्याचा संग करू नये. (225)

भक्तांमध्ये दोष पहाणाऱ्या, अवगुणांबाबत बोलणाऱ्या, मनस्वी व गुरुद्रोह्याची संगत धरू नये. (226)

जो मनुष्य सत्कार्य, सत्छास्त्र किंवा सत्संगाची नालस्ती करत असेल, त्याचा संग करू नये. (227)

ज्याच्या बोलण्याने भगवंत, गुरु किंवा सत्संगा-विषयी निष्ठा ढळत असेल, त्याचा संग त्यागावा. (228)

ज्याला अक्षरपुरुषोत्तमांवर दृढ निष्ठा असेल, दृढ भक्ती असेल आणि विवेकी असेल, त्याचा संग आदराने करावा. (229)

भगवंत किंवा गुरूंवाक्यांवर निःसंशय, श्रद्धा ठेवणाऱ्या, बुद्धिमान माणसाची, संगत आदराने करावी. (230)

आज्ञापालनात जो नेहमी उत्साहाने तत्पर व दृढ असेल, जो निर्मानी व सरळ असेल, त्याचा संग आदराने करावा. (231)

भगवंत व गुरूंच्या दिव्य व मनुष्य चरित्रांमध्ये जो स्नेहपूर्वक दिव्यत्वाचे दर्शन करत असेल त्याचा संग आदराने करावा. (232)

सत्संगात जो मनुष्य दुसऱ्यांचे गुणग्रहण करण्यात तत्पर असेल, दुर्गुणांची गोष्ट करत नसेल, सुहृदभावी (सौहार्दभावी) असेल त्याचा संग आदराने करावा. (233)

ज्याच्या आचरणात आणि विचारात गुरूंना प्रसन्न करण्याचे एकमात्र लक्ष्य असेल त्याचा संग आदराने करावा. (234)

यथाशक्ती व आवडीनुसार स्वसंप्रदायाच्या संस्कृत व प्राकृत भाषेतील ग्रंथांचे पठन-पाठन करावे. (235)

वचनामृत, स्वामींचे उपदेशामृत व गुणातीत गुरूंचे जीवनचरित्र नेहमी भावपूर्वक वाचावेत. (236)

स्वामिनारायण भगवान व गुणातीत गुरूंचे उपदेश व चरित्रे सत्संगींचे जीवन आहे. त्यामुळे सत्संगींनी त्यांचे शांत चित्ताने श्रवण, मनन व निदिध्यासन महिम्यासह, श्रद्धापूर्वक व भक्तीने रोज करावे. (237-238)

संप्रदायाच्या सिद्धांतांत बाधा व संशय उत्पन्न करणारी वचने वाचू, ऐकू किंवा मानू नयेत. (239)

स्वामिनारायण भगवंतांविषयी हृदयामध्ये पराभक्ती दृढ करण्यासाठी गुरूहरींच्या आदेशाने चातुर्मासात व्रत करावे. (240)

त्यामध्ये चांद्रायण, उपवास वगैरे व मंत्रजप, प्रदक्षिणा, कथाश्रवण, अधिक दंडवत प्रणाम करणे इत्यादी विशेष भक्तीचे आचरण श्रद्धेने, प्रीतीपूर्वक आणि भगवंतांची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी करावे. (241-242)

तेव्हा यथाशक्ती व आवडीने संप्रदायाच्या ग्रंथांचे नियमपूर्वक पठन-पाठन करावे. (243)

भगवंतांविषयी प्रीती वाढवण्यासाठी सर्व सत्संगींनी हर्षोल्हासाने भक्तिभावाने उत्सव साजरे करावेत. (244)

भगवान स्वामिनारायण तथा अक्षरब्रह्म गुरूंचे जन्ममहोत्सव भक्तिभावाने सदैव साजरे करावेत. (245)

सत्संगी जनांनी श्रीहरि व गुरूंच्या विशिष्ट प्रसंगांच्या दिनी यथाशक्ती पर्वोत्सव साजरे करावेत. (246)

पर्वोत्सवांत भक्तीपूर्वक सवाद्य कीर्तन करावे व विशेषत्वाने त्यांच्या महिम्याविषयी बोलावे. (247)

चैत्र शुक्ल नवमीला रामचंद्र भगवंतांचे पूजन करावे. श्रावण कृष्ण अष्टमीला कृष्ण भगवंतांचे पूजन करावे. (248)

शिवरात्रीला शंकर भगवंतांचे पूजन करावे, भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतींचे पूजन करावे. (249)

आश्विन कृष्ण चतुर्दशीला हनुमानजींचे पूजन करावे, मार्गात कोणतेही देवमंदिर आले तर त्या देवांना भक्तिभावाने प्रणाम करावा. (250)

विष्णू, शंकर, पार्वती, गणपती तथा सूर्य ह्या पाचही देवांना पूज्य मानावे. (251)

अक्षरपुरुषोत्तम महाराजांविषयी दृढ निष्ठा ठेवावी, तरी सुद्धा इतर देवांची निंदा करू नये. (252)

अन्य धर्म, संप्रदाय किंवा त्यांच्या अनुयायांचा द्वेष करू नये, त्यांची निंदा करू नये, त्यांना सदा आदर द्यावा. (253)

मंदिर, शास्त्र आणि संतांची कधीही निंदा करू नये. त्यांचा यथाशक्ती व यथोचित सत्कार करावा. (254)

संयम, उपवास इत्यादी जे जे तपाचे आचरण करायचे ते तर केवळ भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी आणि भक्तीसाठीच करावे. (255)

एकादशीचे व्रत सदा परम आदराने करावे. त्या दिवशी निषिद्ध वस्तू कधीही खाऊ नयेत. (256)

उपवासात दिवसाच्या झोपेचा प्रयत्नपूर्वक त्याग करावा. दिवसा घेतलेल्या झोपेने उपवासरुपी तपाचा नाश होतो. (257)

भगवान स्वामिनारायणांनी स्वतः ज्या स्थानांना प्रसादीक केले आहे, अक्षरब्रह्मस्वरूप गुरूंनी ज्या स्थानांना प्रसादीक केले आहे, त्या स्थानांची यात्रा करायची इच्छा असेल त्यांनी यथाशक्ती व आवडी प्रमाणे करावी. (258-259)

अयोध्या, मथुरा, काशी, केदारनाथ, बदरीनाथ आणि रामेश्वर इत्यादी तीर्थांची यात्रा यथाशक्ती व आवडीप्रमाणे करावी. (260)

मंदिरात आलेल्या सर्वांनी मर्यादांचे पालन अवश्य करावे. मंदिरात आलेल्या पुरुषांनी स्त्रियांना स्पर्श करू नये, तथा स्त्रियांनी पुरुषांना स्पर्श करू नये. (261)

मंदिरात स्त्री-पुरुषांनी सदैव सत्संगाच्या नियमानुसार वस्त्रे परिधान करावीत. (262)

भक्तांनी भगवान व गुरूंच्या दर्शनाला कधीही रिक्त हस्ते जाऊ नये. (263)

सर्व सत्संगींनी सूर्य व चंद्र ग्रहणांच्या वेळी सर्व क्रियांचा त्याग करून भगवंतांचे भजन करावे, त्यावेळी झोप आणि अन्नाचा त्याग करून, एका जागेवर बसून ग्रहण संपे पर्यंत भगवंतांचे भगवत्कीर्तनादी करावे. (264-265)

ग्रहण सुटल्यावर सर्वांनी सचैल स्नान करावे. त्यागींनी भगवंतांची पूजा करावी आणि गृहस्थांनी दान करावे. (266)

जन्म-मरणाचे सोयरसुतक तथा श्राद्ध आदिक विधी सत्संगाच्या रीती अनुसरून पाळावे. (267)

काही अयोग्य आचरण झाल्यास भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी शुद्धभावाने प्रायश्चित्त घ्यावे. (268)

आपत्काळीच आपद्धर्म पाळावेत. छोट्या आपत्तीला मोठी आपत्ती मानून धर्माचा त्याग करू नये. (269)

कष्टदायक आपत्ती आल्यास भगवद्बलाने ज्या प्रकारे स्वतःचे व दुसऱ्यांचे रक्षण होईल असे करावे. (270)

विवेकी मनुष्याने प्राणसंकट ओढवल्यास गुरूंच्या आदेशांनुसार प्राण रक्षण करावे व सुखाने राहावे. (271)

सर्व सत्संगींनी सत्संगाच्या रीतीप्रमाणे, गुरूंच्या आदेशानुसार, परिशुद्ध भावनेने देश, काळ, स्थितीनुसार तथा यथाशक्ती आचार, व्यवहार आणि प्रायश्चित्त करावे. (272-273)

धर्म-नियम पाळल्याने जीवन उन्नत होते आणि दुसऱ्यांना पण सदाचार पाळण्याची प्रेरणा मिळते. (274)

भगवद्भक्तांनी भूत, प्रेत, पिशाच्च आदींचे भय कधीही बाळगू नये. अशा गैर समजुतींचा त्याग करून सुखाने राहावे. (275)

शुभ तथा अशुभ प्रसंगात माहात्म्यासहित पवित्र सहजानंद नामावलीचा पाठ करावा. (276)

ज्यांना सत्संगाचा आश्रय झाला आहे, त्यांचे काळ, कर्म किंवा माया कधीही अनिष्ट करण्यास समर्थ होतच नाहीत. (277)

सत्संगींनी अयोग्य विषय, व्यसन आणि अंधश्रद्धेचा सदैव त्याग करावा. (278)

काळ, कर्म आदींचे कर्तेपण मानू नये. अक्षरपुरुषोत्तम महाराजांना सर्वकर्ता मानावे. (279)

विपत्ती आल्यास धैर्य ठेवावे, प्रार्थना करावी, प्रयत्न करावे आणि अक्षरपुरुषोत्तम महाराजांवर दृढ विश्वास ठेवावा. (280)

त्यागाश्रम ग्रहण करण्याची इच्छा असेल त्यांनी अक्षरब्रह्मस्वरूप गुरूंकडून दीक्षा ग्रहण करावी. सर्व त्यागींनी सदैव अष्टप्रकारे ब्रह्मचर्य पाळावे. (281)

त्यागींनी धनाचा त्याग करावा आणि स्वतःचे करून ठेवू नये. धनाला स्पर्श सुद्धा करू नये. (282)

त्यागींनी अक्षरपुरुषोत्तम महाराजांविषयी प्रीती वाढवण्यासाठी सदैव निष्कामपणा, निर्लोभपणा, निःस्वादपणा, निःस्नेहपणा, निर्मानपणा तथा त्यागींचे इतर सद्गुण धारण करावेत. (283-284)

त्यागींनी स्वतःच्या आत्म्याची अक्षरब्रह्मांसोबत एकता करून दिव्यभावाने सदैव स्वामिनारायण भगवंतांचे भजन करावे. (285)

त्याग हा केवळ त्यागच नाही परंतु हा त्याग तर भक्तिमय आहे. हा त्याग अक्षरपुरुषोत्तम महाराजांना प्राप्त करण्यासाठी आहे. (286)

आज्ञा-उपासने विषयी हे सिद्धांत सर्वजीवहितावह आहेत. दुःख विनाशक आहेत आणि परम सुखदायक आहेत. (287)

या ग्रंथाला अनुसरून जे जन श्रद्धा आणि प्रीतीने स्वतःच्या जीवनात आज्ञा-उपासना दृढ करतील, ते भगवंतांची प्रसन्नता प्राप्त करून त्यांच्या कृपेस पात्र होतील. ग्रंथामध्ये सांगितलेल्या ब्राह्मी स्थितीला जिवंतपणीच प्राप्त करून घेतील. एकांतिक धर्म सिद्ध करून भगवंतांचे शाश्वत, दिव्य असे अक्षरधाम प्राप्त करतील, आत्यंतिक मुक्ती मिळवतील आणि सुख प्राप्त करतील. (288-290)

अक्षरब्रह्मांचे साधर्म्य प्राप्त करून पुरुषोत्तमांची दास्यभावाने भक्ती करावी हीच मुक्ती मानण्यात आली आहे. (291)

या रीतीने संक्षेपाने येथे आज्ञा आणि उपासनेचे वर्णन केले. त्याचा विस्तार संप्रदायाच्या ग्रंथांतून जाणावा. (292)

सत्संगींनी प्रतिदिन या ‘सत्संगदीक्षा’ ग्रंथाचा एकाग्र चित्ताने पाठ करावा. पाठ करण्यास असमर्थ असेल त्याने प्रीतीपूर्वक त्याचे श्रवण करावे आणि श्रद्धेने त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करावा. (293-294)

परमात्मा परब्रह्म स्वामिनारायण भगवंतांनी अक्षरपुरुषोत्तम सिद्धांताची स्थापना केली आणि गुणातीत गुरूंनी त्याचे प्रवर्तन केले. त्या सिद्धांतानुसार हा ग्रंथ रचला आहे. (295-296)

परब्रह्म दयाळू स्वामिनारायण भगवंत कृपा करूनच मुमुक्षूंच्या मोक्षासाठी या लोकात अवतरले. सर्व आश्रित भक्तांच्या योगक्षेमाची काळजी घेतली व लोक तथा परलोक अशा दोन्ही प्रकारांचे त्यांनी कल्याण केले. (297-298)

सर्वत्र परमात्मा परब्रह्म स्वामिनारायण भगवंतांचे दिव्य कृपाशिष सदैव वर्षावे. (299) सर्वांचे सर्व दःख, त्रिविध ताप, उपद्रव, क्लेश, अज्ञान, संशय तसेच भय नष्ट व्हावे. (300)

भगवंतांच्या कृपेने सर्वांना निरामय स्वास्थ्य, सुख, परम शांती आणि परम कल्याण प्राप्त व्हावे. (301)

कोणत्याही मनुष्याने कोणाचाही द्रोह तथा द्वेष करू नये. सर्वांनी सदैव परस्पर आदरभाव ठेवावा. (302)

अक्षरपुरुषोत्तमांविषयी सर्वांना दृढ प्रीती, निष्ठा, निश्चय व्हावा आणि त्यांच्यावरील विश्वासात सदैव वृद्धी व्हावी. (303)

सर्व भक्त धर्म पालनास समर्थ व्हावे आणि सहजानंद परमात्म्याची प्रसन्नता प्राप्त करावी. (304)

संसार प्रशांत, धार्मिक, साधनाशील व अध्यात्ममार्गी चालणाऱ्या मनुष्यांनी युक्त व्हावा. (305)

सर्व मनुष्यांमध्ये परस्पर ऐक्य, सुहृद्भाव (सौहार्द), मैत्री, करुणा, सहनशीलता आणि स्नेहाची वृद्धी व्हावी. (306)

ब्रह्म आणि परब्रह्मांच्या दिव्य संबंधाने सत्संगाविषयी सर्वांना निर्दोषभाव आणि दिव्यभावाची दृढता व्हावी. (307)

सर्वांनी स्वतःच्या आत्म्याविषयी अक्षररुपता प्राप्त करून, पुरुषोत्तम सहजानंदांची भक्ती प्राप्त करावी. (308)

विक्रम संवत् २०७६ च्या माघ शुक्ल पंचमीला हा ग्रंथ लिहिण्याचा आरंभ केला आणि चैत्र शुक्ल नवमीला स्वामिनारायण भगवंतांच्या दिव्य जन्मोत्सवाला तो पूर्ण झाला. (309-310)

उपास्य परब्रह्म सहजानंद श्रीहरि तसेच मूळ अक्षर गुणातीतानंद स्वामी, साक्षात ज्ञानमूर्ती समान भगतजी महाराज, सत्य सिद्धांताचे रक्षक असे यज्ञपुरुषदासजी (शास्त्रीजी महाराज), सदैव वात्सल्याने भिजलेले आणि आनंदमय ब्रह्म असे योगीजी महाराज, तसेच विश्ववंद्य आणि विनम्र असे गुरू प्रमुख स्वामी महाराजांना ही ग्रंथरुपी अंजली त्यांच्या जन्मशताब्दी प्रसंगी आनंदाने व भक्तीभावाने अर्पण करण्यात आली आहे. (311-314)

भगवान स्वामिनारायण म्हणजेच साक्षात अक्षरपुरुषोत्तम महाराज यांनी संपूर्ण विश्वामध्ये परम आनंद-मंगल विस्तार करावा. (315)

इति परब्रह्मस्वामिनारायण-प्रबोधिताऽऽज्ञोपासन-सिद्धान्तनिरूपकं

प्रकटब्रह्मस्वरूपश्रीमहन्तस्वामिमहाराजैः स्वहस्ताऽक्षरैर्गुर्जरभाषया

लिखितं महामहोपाध्यायेन साधुभद्रेशदासेन च संस्कृतश्लोकेषु

निबद्धं सत्सङ्गदीक्षेति शास्त्रं सम्पूर्णम् ।

 

0 comments

પરિચય પરીક્ષા - નિબંધ -3 - બાળવયે સત્સંગમય શાંતિલાલ (સ્વામિનારાયણ પ્રકાશ : જાન્યુઆરી -2022, પા.નં. 14-15)

 બાળવયે શાંતિલાલ સૌથી નોખા તરી આવતા હતા, તેનું એક સૌથી મોટું કારણ હતું - બાળપણથી જ સેવામય, ભક્તિમય, સરળ, સુહૃદયી સ્વભાવ. શાંતિલાલને પિતાજીની...